सवाई आणि मी.

होणार होणार म्हणता म्हणता खरोखरी सवाई गंधर्व संगीत महोत्सवात माझे गाणे झाले…आज जवळ जवळ तीन आठवड्याने रेकोर्डिंग ऐकले आणि मनात अनेक गोष्टी आल्या…

गाणे शिकायला लागून आता ३३ वर्षे झाली.. सवाई मध्ये गावे अशी इच्छा, महत्वाकांक्षा साधारणपणे १५ वर्षे तरी मनात होती. त्यामुळे तयारी तर एका बाजूला चालूच होती आणि गेली निदान १० एक वर्षे नियमितपणे विनंती करणे पण चालू होते… २००० साली आळेकर सरांच्यामुळे टाईम्स म्युझिक साठी माझे गाणे झाले होते तेंव्हा पंडित भीमसेनजी गाणे ऐकायला समोर बसले होते… त्यांनी माझे संपूर्ण गाणे ऐकून मला आशीर्वाद दिले होते…  तेंव्हा असा विचार केला होता कि भीमसेनजींनी गाणे ऐकले आणि आशीर्वाद दिले, आता प्रत्यक्ष सवाईत जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा गाऊ… त्याची आता घाई नाही… आणि तसेही गाण्याबजावण्याच्या क्षेत्रात घाई करून चालत नाही हे पक्के ठाऊक होते…

आज सवाईमध्ये गायलो तेंव्हा समोर साधारणपणे दहा हजार डोळे आपल्याकडे एकदम बघताहेत हा अनुभव नवा होता… अपेक्षा, आनंद , तटस्थता , “बघू तरी काय गातोय हा” असा भाव अशा अनेक प्रकारच्या नजरा माझ्याकडे बघत होत्या… माझी मनस्थिती कशी होती? शब्दात  सांगणे जरा कठीण आहे पण हा कार्यक्रम म्हणजे जीवनातली  अंतिम गोष्ट नाही हे मनात स्पष्ट होते… आता खरी सुरुवात होणार आहे अशी पण एक भावना मनात खूप स्पष्टपणे आली होती…. तसा शांत होतो पण ताण आला होता हे देखील खरे… माझे माटे गुरुजी गाणे ऐकायला स्वतः आले होते त्यानी खूप आधार वाटला.. अभिषेकीबुआंची पुण्याई पाठीशी होतीच आणि रानडे सरांचे आशीर्वादही बळ देत होते… हवेतला गारठा, प्यायलेल्या चहा सदृश पेयातला गोडवा, हळू हळू भरणारा मंडप, तानपुरे लावताना तितक्या गारठ्यातही मला आलेला घाम, भरत आणि चैतू या दोघांचे मनापासून मिळणारे प्रोत्साहन…माळीबुवा ने नवीन सिस्टीम लावली होती असे ऐकले होते तिचे नवेपणाचे भले बुरे अनुभव.. या सगळ्या गोष्टीना बरोबर घेऊन गायला सुरुवात केली…

At the Sawai Mahotsav 2010राग बिलासखानी तोडी माझा आवडता राग… रामाश्रेय झा “रामरंग” यांची नवी बंदिश गायला लागलो” धन धन भाग..” आवाज जरासा थरथरत होता.. पण एक दोन तीन मिनिटांमध्ये माझा आधीचा ताण कमी झाला होता आणि मी आणखी आरामात गायला लागलो… बिलासखानी संपल्यावर शुद्ध धैवत बिभास सुरु करणार तेवढ्यात मिलिंद जी नी मला ५ मिनिटे आहेत असे सांगितले… म्हणून मी तसे लोकांना सांगितले आणि भजन ऐकवतो असे म्हणताच लोकांमधून “नाही नाही शुद्ध धैवत बिभास ऐकवा.. असा जोरदार आवाज आला… माझ्यासाठी हा अनुभव पण खूपच नवीन होता… शेवटी भजन गाऊन गाणे संपवले तेंव्हा टाळ्यांचा गजर झाला आणि मी मनात ” अहंकाराचा वारा न लागो राजसा…. ” असं म्हणत रंगमंचावरून खाली आलो…

काय काय मिळाले मला त्या तासाभरात??

खूप मनापासून ते हातचे राखून का होईना अशी दाद मिळाली… अनेक लोकांना परस्पर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली… मला आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात मिळाला… आणि केवळ सवाईत गायलोय म्हणून मी सॉलिड गायक आहे असं अजिबात मानायचे कारण नाही हे पण लक्षात आले… असे अनेक गायक येतात आणि जातात… प्रयोग परंपरेत त्यांचे पुढे काय होते? प्रयोग परंपरेत अत्यंत महत्वाचा असं मैलाचा दगड आपण गाठला आता पुढे काय?? आणि फार पूर्वी प्रबोधिनीत शिकलेल्या पद्याची ओळ आठवली कि ततः किं?? हे सगळे झाले म्हणून काय झाले ??

स्वतः स्वतःशी विचार करताना चाबूक हातात ठेऊन विचार करायची सवय फार उपयोगी पडते… स्वतःच्या गाण्याचा विचार करताना तर फार बरे पडते हातात चाबूक ठेवणे… तसा विचार केला आणि मला जाणवले कि मी आज जे गायलो इतपत मी गायलाच पाहिजे… त्यामुळे त्यात  फार कौतुक करावे असे काही नाही… रागविचार अधिक सुघड आणि सुसूत्रपणे सुचायला हवा असे वाटले… कुठेतरी मनात मला आज चांगले गाणे गाऊन दाखवलेच पाहिजे अशी इर्षा असल्याने गाणे जास्त आक्रमक झाले कि काय असेही वाटले… स्वराचा परिणाम असतो तसाच आवाजाच्या लगावातून परिणाम साधता येतो आणि त्याचा मला अधिक विचार करायला हवा हे पण जाणवले… विलंबित बिलासखानी जरा लांबला, तो थोडा आटोपशीर ठेवता आले असते… पण गाण्याच्या नादात तिकडे लक्ष राहिले नाही… बाकी जे गायलो त्याचा बर्यापैकी परिणाम झाला आणि लोकांना गाणे आवडले अशा असंख्य प्रतिक्रिया आल्या हे पण झाले… त्याने मला बरेही वाटत राहिले…

गाणे झाल्यानंतर अनेक लोक अनेक प्रकारे भेटत राहिले. माझे सगळे वर्गमित्र आणि योग्या पावशे हा माझा बाल मित्र… सगळे भेटून गेले… माझ्या मनात मात्र तेंव्हा  “आता पुढे काय? ” हा प्रश्न अगदी स्पष्ट होता… आनंद व्यक्त करावा काय? आणि कसा करावा? हे पण प्रश्न होते… किशोर कुलकर्णी “तू चांगला गायलास पण मला जे अपेक्षित गाणे आहे ते काय हे मी तुला येऊन सांगेन” असं म्हणला… काही जणांनी बुवांची  आठवण झाली असं सांगितले.. तर काही लोक म्हणाले कि तुम्ही जरा वेगळे गाता… प्रतिक्रियांच्या या गदारोळात मी जरासा कंटाळून पण गेलो होतो.. असं वाटत होतं कि “ठीक आहे हो…आता आणखी चांगले गायला पाहिजे.. ”

सवाई गंधर्व महोत्सवात गाणे सादर करायला मिळणे हे मोठी भाग्याची म्हणूनच अतिशय अवघड गोष्ट आहे असेही लक्षात आले… ४ दिवसात साधारणपणे २५ कलाकार आपली कला सादर करतात… आता ह्या २५ पैकी काही जागा राखीव… विविध कारणांनी राखीव असतात… त्यात आपला नंबर केंव्हा लागेल याचा काही पत्ता लागू शकत नाही… प्रथमच सवाईत गाणारे साधारण पणे ४ ते ५ कलाकार असतात… त्यातला मी एक… एवढ्या मोठ्या आयोजनामागे किती व्याप असतो ते पण जरा जवळून पाहता आले… श्रीकान्तदादा त्यांची तब्येत बरी नसताना किती धावपळ करीत होते…. श्रीनिवास चा फोन  वाजला नाही असा त्या काळात क्षण विरळाच… आयोजक म्हणून किती आणि कुठले कुठले व्याप हे लोक सांभाळत होते त्याची जराशी कल्पना होती पण जवळून पहायला मिळाले…

भीमसेन जींच्या द्रष्टेपणाची दाद द्यायला हवी… ५८ वर्षांपूर्वी असा कार्यक्रम सुरु करणे आणि तो ५०हून अधिक वर्षे स्वतः चालवणे हे प्रचंड काम आहे… गुरुप्रती असीम श्रद्धा आणि रसिकांचे अलोट प्रेम यामुळे हा महोत्सव आज जगात , संगीत जगात अढळपदी विराजमान आहे… मी त्यात सहभागी झालो हे माझे भाग्य…

समीर दुबळे, ४ जानेवारी २०११

Pt.Jitendra Abhisheki -Savai Gandharva Music Festival – Pune 1992

YouTube Preview Image

Tags: , ,

2 Responses to “सवाई आणि मी.”

  1. Yogesh rairikar 06. Jan, 2011 at 7:11 pm #

    Artist must b a very good human being first & Sir it seems that u r.
    Your love for your music & art is truly divine & I can feel it through this presentation & yr face on the FB. M very little to say something about great artist but please take this as my love for the music & respect for the people who serve for this.
    I can say only “God Bless our Music..i.e. Hindustani” & from the bottom of my heart I say thanks for wishing me on my birthday. Looking forward for many more achievements of yrs in this divine art..

    Regards,

    Yogesh Rairikar

    • Sameer 07. Jan, 2011 at 11:30 am #

      Dear Yogesh,
      Thanks a lot for the kind words… I would be really happy if I could continue my musical work in my own humble way in the years to come… The achievements would follow…. :)

      Best
      Sameer

Leave a Reply

*